तभा फ्लॅश न्यूज/पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू ‘केसरी’ चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. टिळकवाडा, पुणे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दुपारी बारानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Deepak Tilak)
डॉ. दीपक टिळक यांनी टिळक कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचा वारसा प्रामाणिकपणे पुढे नेला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे दीर्घकाळ कुलगुरू म्हणून त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात दर्जेदार काम केले. ‘केसरी’ या ऐतिहासिक दैनिकाचे विश्वस्त संपादक म्हणून त्यांनी राष्ट्रभक्ती, लोकशिक्षण आणि मूल्याधिष्ठित विचारांच्या प्रचाराची परंपरा अखंडपणे जपली.
ते शिक्षण क्षेत्रातील सुधारणावादी विचारवंत, कुशल प्रशासक आणि संवेदनशील संपादक म्हणून ओळखले जात. पुण्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेले होते. त्यांच्या निधनाने पुण्यात शोककळा पसरली.