तभा फ्लॅश न्यूज /सोलापूर : हृदयरोगाच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत भर पडत असताना, सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या संशोधनातून एक दिलासादायक यंत्रणा समोर आली आहे. त्यांनी तयार केलेल्या ईसीजी जॅकेट या नवकल्पनात्मक उपकरणाला नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट प्रदान करण्यात आले आहे. हे जॅकेट हार्ट अटॅकचे निदान अचूक आणि जलद करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
ग्रामीण भागासाठी वरदान ठरणारे उपकरण
सध्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत. अनेक ठिकाणी ईसीजी मशीन उपलब्ध नसते, किंवा तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे ते वापरणे कठीण जाते. अशा परिस्थितीत डॉ. परळे यांचे हे ‘ईसीजी जॅकेट’ केवळ एका क्लिकवर मोबाईलद्वारे ECG रिपोर्ट पाठवण्यास सक्षम आहे. त्यामुळे वेळेवर निदान होऊन उपचारांची सुरुवात लवकर होऊ शकते.
12 लीड ECG मिळणार एका क्लिकवर
डॉ. परळे यांनी स्पष्ट केले की, बाजारात सध्या उपलब्ध असलेली उपकरणे फक्त हृदयाचे ठोके मोजतात किंवा अनियमितता दाखवतात, परंतु हृदयविकाराच्या निदानासाठी आवश्यक असणारा 12 लीड ECG फार थोडीच उपकरणे देऊ शकतात. हे जॅकेट मात्र 12 लीड ECG सहजगत्या, अचूकपणे आणि कोणत्याही तांत्रिक त्रुटीशिवाय तयार करते.
1300 रुग्णांवर अभ्यास, जागतिक परिषदेत सादरीकरण
या संशोधनासाठी डॉ. परळे यांनी 1300 हृदय रुग्णांचा सखोल अभ्यास केला. छाती आणि पोटावरील योग्य पॉईंट्स (electrode positions) शोधून ECG जसा नेहमी घेतला जातो, तसाच अचूक ECG या जॅकेटद्वारे मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध केलं. 2020 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजीमध्ये या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले होते.
खेड्यापाड्यातही पोहोचवण्याचा मानस
“माझ्या 30 वर्षांच्या अनुभवातून अनेकदा वेळेवर ECG न झाल्यामुळे किंवा चुकीचे निदान झाल्यामुळे रुग्ण दगावले आहेत. हे जॅकेट घरबसल्या ECG घेण्यास मदत करणार आहे. यामुळे खासकरून खेड्यांमधील रुग्णांना दिलासा मिळणार आहे,” असे डॉ. परळे यांनी सांगितले. हे जॅकेट ८ ते १० हजार रुपयांत रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.