तभा फ्लॅश न्यूज/वाशी : राज्यात ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहीम करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी झालेल्या एका बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे.
देशात सर्वाधिक वनाच्छदन वाढविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड माँ के नाम या अभियानात महाराष्ट्र चांगली कामगिरी करत आहे. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून देखील वृक्ष लागवडीची जयंत तयारीत करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत ‘हरित धाराशिव अभियान’ मोहीम हाती घेत यंदा प्रथमच १५ लक्ष पेक्षा अधिक वृक्ष लागवड केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्ष लागवडीसाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्वांचे अभिनंदन करत या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.
वाशी तालुक्यात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम तालुका प्रशासनाकडून मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, सामाजिक संस्था या वृक्ष लागवडीच्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून गावागावात जनजागृती देखील करण्यात येत आहे. (दि.१८) जुलै रोजी तालुक्यातील तेरखेडा येथे तालुका प्रशासनाकडून वृक्ष लागवड जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
यामध्ये गावातील गणेश विद्यालय शाळा, सुबोध विद्यामंदिर शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा, जि.प कन्या शाळा, आदर्श विद्यामंदिर शाळेतील हजारो विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ढोल, ताशा वाजत गाजत झाडे लावा झाडे जगवा, एक पेड माँ के नाम, वृक्ष लागवडी मोहिमेत सहभागी होवा अश्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे या हरित धाराशिव अभियान रॅलीत तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहेत्रे, नायब तहसीलदार शिंदे, तालुका गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप, मुख्याध्यापक बाबुराव कोकाटे, अरूण बोंदर, तलाठी प्रवीण पालखे सह सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.