तभा फ्लॅश न्यूज/परळी वैजनाथ : परळी ते नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी मार्गावरील एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत वसंतनगर, परळी येथील अनिल प्रेमदास राठोड हे युवक गंभीर जखमी झाले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकी काही मीटर अंतरावर फेकली गेली, तर राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या पायाचे शरीरापासून वेगळे होण्यासारखी गंभीर अवस्था झाली होती. तात्काळ मदत करणाऱ्या नागरिकांनी त्यांना अत्यवस्थ अवस्थेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु, जखम अत्यंत गंभीर असल्याने त्यांना त्वरित आंबाजोगाई येथील स्व. रा. ति. वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली आणि घटनेचा पंचनामा व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.
या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून राठोड यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी नागरिकांनी वारंवार एसटी प्रशासन व वाहतूक नियंत्रण यंत्रणेकडून अधिक दक्षतेची मागणी केली आहे.