तभा फ्लॅश न्यूज/जाफराबाद : खरीप हंगामात युरियासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक आणि कृषी सेवा केंद्रांमधील बेकायदेशीर दडपशाहीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांनी गुरुवारी कृषी विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली असतानाही त्यांना युरिया मिळत नसल्याचे वास्तव बोर्डे यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. “युरिया हवे असल्यास इतर खते घेणे बंधनकारक आहे, अशी सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ कारवाई न झाल्यास, आम्ही स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ,” असा ठणठणीत इशारा त्यांनी दिला.
लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
युरिया खत उपलब्ध असतानाही कृषी दुकानदार शेतकऱ्यांना दुसरे खते खरेदी करण्यास भाग पाडतात. दर पिशवीमागे ₹100 ते ₹150 अधिक दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. शिवाय, काही दुकानदारांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करून युरिया साठवून ठेवले असल्याचेही उघड झाले आहे.
बोगस कंपन्यांचीही शेतकऱ्यांवर लुट
मयुर बोर्डे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, बोगस कंपन्यांचे प्रतिनिधी दलालांमार्फत खेड्यापाड्यांत फिरून नकली खते व औषधांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण पिकांनाही धोका निर्माण होतो.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
या सर्व प्रकारांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, असा इशारा मयुर बोर्डे यांनी दिला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम शेवत्रे, समाधान गाढवे, भाई प्रदीप नरवाडे, आकाश मुरकुटे, गणेश मुरकुटे, राजु बनकर, रामदास शेवत्रे, सतीश गायकवाड, गजानन कोथळकर, सतीश मुरकुटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.