तभा फ्लॅश न्यूज/महेश भंडारकवठेकर : पंढरपूर शहरात मंगळवारी अर्धा ते पाऊणतास पावसाच्या सरी बरसल्या या मुळे शहरातील अनेक रस्त्यांवर महापूरा सारखे पाणी साचलेले होते. पंढरपूर नगर पालिकेकडून नालेसफाई, गटारींची सफाई केली जात नाही. त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसत आहे. या बरोबरच शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, उपनगरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यामुळे पंढरपूरचा विकास हा खरंच भकास होतो आहे का ? असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरात दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या वेळी काही वेळ पावसाच्या धारा बरसल्या त्या नंतर मंगळवारी (ता.२२) दुपारी देखील पाऊस बरसला, पावसाळा असल्याने पाऊस हा बरसणारच मात्र या अर्धा ते पाऊणतासाच्या पावसाने शहरातील अनेक भागात महापूरा सारखी परिस्थिती रस्त्यांवर निर्माण झाल्याचे दिसुन आले. विशेषत: शहरातील मुख्य असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा, शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते काळा मारुती,नाथचौक या बरोबरच घोंगडे गल्ली,संतपेठ आदी भागातील रस्त्यांना अगदी महापुर आल्यानंतर ज्या प्रमाणे रस्त्यांवर पाणी भरते तशी रस्त्यांची अवस्था निर्माण झाली होती.
वास्तविक हे दयनीय चित्र पहात असताना सहाजिकच विठ्ठलाची नगरी, तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या नावाने शासनाकडून लाखो रुपये अनुदान मिळविणारी येथील नगरपालिका शहरात स्वच्छता करते का ? असा प्रश्न सर्वसामान्य पंढरपूरकरांपुढे उपस्थित झाल्या शिवाय रहात नाही.
त्यामुळेच ऐरव्ही जावु द्या निदान पावसाळ्या पूर्वी तरी शहरातील मोठे नाले ,ड्रेनेज तसेच उघड्या गटारी यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. कारण जर थोड्याशा पावसामुळे पंढरपूर शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांवर अशा प्रकारे महापुरा प्रमाणे साचलेले पाणी पाहुन खऱ्या अर्थाने पंढरपूरचा विकास होतो आहे की विकासाच्या नावाखाली पंढरपूर भकास होते आहे अशा संतप्त प्रतिक्रिया पंढरपूरकर नागरिकांकडून व्यक्त होताना ऐकावयास मिळाता आहेत.
पंढरपूरचा नावलौकीक जपण्याची गरज
पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे सहाजिकच बाहेरगावच्या नागरिकांची देखील दररोज येथे मांदियाळी असते. अशातच पंढरपूरच्या रस्त्यांची अर्ध्या, पाऊणतासाच्या पावसामुळे अशी दयनीय अवस्था पाहिल्यावर राज्यभरात पंढरपूरचा नावलौकीक काय होत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळेच येथील पालिकेच्या आधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने शहर स्वच्छतेकडे लक्ष देवून तिर्थक्षेत्र पंढरपूरची दैनंदिन स्वच्छता कशी राखली जाईल, पंढरपूर शहर खड्डेमुक्त कसे होईल याकडे जाणिवपूर्वक लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
विविध पक्षीय राजकीय मंडळींचे देखील दुर्लक्ष
कोट्यावधी रुपयांचा शासन निधी मिळवून पंढरपूरच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या मंडळींनी देखील पंढरपूर विकासाच्या खोट्या गप्पा मारण्या पेक्षा खरोखर पंढरपूरचा विकास योग्य रितीने होतो आहे काय हे जाणीवपूर्वक लक्ष देवून पाहण्याची आणि जर तसे काम पालिकेच्या आधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून होत नसेल तर त्यांना जाब विचारण्याची देखील तयारी दर्शविली पाहिजे. त्यामुळेच पंढरपूर अशी अपेक्षा पंढरपूर वासियांकडून आपसुकच व्यक्त होताना ऐकावयास मिळत आहे.
स्वच्छता अभियानातील कचऱ्याच्या आकडेवारीचै गौडबंगाल
आषाढी यात्रे अगोदर पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी शेकडो टन कचरा उचलला गेल्याच्या बातम्या शासकीय स्तरावर प्रसिध्दीस देण्यात आल्या. वास्तविक जर एका दिवशी स्वच्छता करुन शेकडो टन कचरा स्वच्छता अभियानातून उचलला जात असेल तर येथील नगरपालिका दररोज शहरात कोणती स्वच्छता करते ? हा देखील सवाल सर्वसामान्य शहरवासियांकडून उपस्थित होतो आहे.
खड्यांची पाचवीला पुजलेली समस्यांच
शहरातील स्वच्छतेच्या विषया बरोबरच शहरातील रस्त्यांची खड्यांमुळे झालेली दूरवस्था, या खड्यांच्या रस्त्यांवरुन जाताना वृध्द, महिला तसेच लहान मुलांचे हाल, वाहनचालकांना वाहन चालविताना करावी लागणारी कसरत आदी समस्यांकडे देखील पहायला कोणाला वेळ नाही. मंत्री, संत्री येणार म्हटल्यावर तसेच यात्रांच्या अगोदर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्यांमधून डांबरसदृश्य आँईल मिश्रीत द्रावणाच्या छिरकाव्यासह कचखडी भरुन ठिगळे लावण्याचे काम ठेकेदार मंडळींकडून पालिकेचे आधिकारी मनलावून करुन घेताना दिसुन येतात. त्यामुळे शहरातील दर्जेदार रस्त्यांचे पंढरपूरकरांचे स्वप्न कधी पुर्ण होणार हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे शेवटी पंढरपूरकराच्या नशिबी काय तर खड्यांचा पाचविला पुजलेली समस्या आहेच.