तभा फ्लॅश न्यूज/पारध : श्री मारुती महाराजांचे जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वालसा वडाळा येथे मराठवाडा, विदर्भ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, या पवित्र स्थळाकडे येण्यासाठीचा दोन किलोमीटरचा मुख्य रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे. रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, दुचाकीस्वार व वाहनचालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
हा रस्ता कोळेगाव, माळेगाव, कोठा जहागीर, कोसगाव, रेलगाव या भागांना जोडतो. शालेय विद्यार्थिनी, महिला वर्ग, शेतकरी आणि प्रवासी यांची या रस्त्यावरून नियमित ये-जा असते. त्यामुळे या रस्त्याचे दर्जेदार दुरुस्ती काम करणे अत्यंत आवश्यक आहे. शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या तीन वर्षांपासून निवेदने दिली गेली आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
खड्ड्यांमुळे अपघात, जीवितधोक्याची शक्यता
रस्त्यावरील मोठे खड्डे आणि पावसामुळे झालेली चिखलमय अवस्था यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे हातपाय मोडले आहेत. वाहने चालवताना अपघाताचा धोका कायम असून, शालेय मुलींना शाळेत जाणे देखील धोकादायक झाले आहे.