तभा फ्लॅश न्यूज/ रियाज मोमिन : देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा किर्तीताई घोरपडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी (दि. २५ जुलै) बारगळला. बैठकीपूर्वी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे एक महिला नगरसेवक जखमी झाली, तर बारा नगरसेवकांनाही गाडीतच अडकून राहावे लागले. परिणामी, ठरावासाठी आवश्यक उपस्थिती न झाल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.
नगराध्यक्षा घोरपडे यांच्या विरोधात १७ पैकी १२ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे पिठासीन अधिकारी म्हणून, तर मुख्याधिकारी संतोष लोमटे हे सहाय्यक म्हणून उपस्थित होते.
दुपारी सभेला सुरुवात झाली. मात्र, अविश्वास ठराव मांडणारे नगरसेवक सभागृहात पोहोचू शकले नाहीत. याचदरम्यान, नगरसेवकांना घेऊन येणाऱ्या वाहनावर जमावाने दगडफेक केली. यात एक महिला नगरसेवक जखमी झाली, तर उर्वरित नगरसेवक सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनातच थांबले.
सभागृहात केवळ भाग्यलक्ष्मी मळभगे, अमित मानकरी, रेणुका कोतवाल, शारदा लांडगे, किर्तीताई घोरपडे आणि दोन नामनिर्देशित सदस्य असे एकूण सात सदस्य उपस्थित होते. पिठासीन अधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या वेळेत चार वेळा सभागृहात पुकारा केला, मात्र नव्याने कोणीही उपस्थित झाला नाही.
नगरपंचायतीच्या नियमानुसार, एक द्वितीयांश म्हणजे किमान ९ सदस्य उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामध्ये अपयश आल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला, व नगराध्यक्ष घोरपडे यांनी आपले स्थान सावरले.
दगडफेकीमुळे निर्माण झालेला गोंधळ, पोलीस बंदोबस्तात वाढ आणि बैठकीतील अपयश यामुळे देवणीत मोठा राजकीय खळबळ उडाली असून पुढील घडामोडींकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.