तभा फ्लॅश न्यूज/जयपूर : रेड सिनेमाची आठवण करून देणारी थरारक घटना ओडिशात उघडकीस आली आहे. राज्यातील जयपूर वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक (Deputy Ranger) रामचंद्र नेपक यांच्या घरावर छापा टाकताना 1.44 कोटी रुपयांची रोख रक्कम, सोन्याची बिस्किटे आणि नाणी सापडली आहेत. हे पाहून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
या छापेमारीत नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली. नोटांच्या थप्प्या मोजताना मशीन गरम झाली, कर्मचारी दमले, घामाने भिजले पण रोकड मोजून संपेचना. हे सर्व पैसे 100, 200 व 500 रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्यांमध्ये सापडले. घरात जिकडे पाहावे तिकडे केवळ नोटांचे ढीगच दिसत होते.
ही कारवाई जयपूरच्या विशेष दक्षता न्यायालयाच्या वॉरंटवरून करण्यात आली. राज्य दक्षता विभागाच्या (Vigilance Department) ६ डीएसपी, ५ इन्स्पेक्टर आणि ९ एएसआय यांच्या नेतृत्वाखाली एक भलीमोठी टीम तयार करून एकाचवेळी नेपक यांच्या सहा ठिकाणांवर धाडसत्र सुरू करण्यात आले.
छापेमारी करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये
-
जयपूर टाऊनमधील एनकेटी रोडवरील पीआर पेटा येथील निवासस्थान
-
कोरापुटमधील वडिलोपार्जित मालमत्ता
-
नेपक यांचे सासरवाडी परिसर
-
भुवनेश्वरमधील संपर्कस्थळ
या ठिकाणांवरही तपास यंत्रणांनी एकाच वेळी धाड टाकली.
दक्षता विभागाने केवळ रोख रक्कमच नव्हे तर सोन्याचे बिस्किट, नाणी, महागड्या वस्तू, आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. या संपत्तीबाबत कायदेशीर कारवाई आणि उत्पत्ती तपास सुरू आहे.
ओडिशात भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला ही धडक कारवाई मोठं यश मानलं जात आहे. नेपक यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, भ्रष्टाचार किती खोलवर रुजलेला आहे आणि प्रशासन किती सजगपणे त्याच्यावर हात घालत आहे.