तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला, कन्नड तालुक्यातील विविध भागांमध्ये सर्पदंशाच्या चार घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चारही व्यक्तींना तात्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अक्रम इसाक शेख (वय ३४), रा. करीमनगर,सुमैय्या शाहिद पठाण (वय २३), रा. हिवरखेडा, ता.कन्नड,साहिल सतीश जाधव (वय १८), रा. चापानेर, ता. कन्नड,सतीश माधवराव काकडे (वय ३४), रा. वडाळी, ता. कन्नड या चारही घटनांमध्ये सापांच्या चाव्यांमुळे या रुग्णांना तीव्र वेदना जाणवू लागल्याने नातेवाइकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले असून, सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली.
सणाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी आवश्यक
नागपंचमीच्या काळात पावसामुळे सापांचे वास्तव्य असलेले खड्डे, झाडाझुडपं, घरांच्या आडोशात असलेली जागा ओलसर व उबदार झाल्यामुळे साप सहजपणे बाहेर पडतात. याच कारणामुळे या कालावधीत सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. ग्रामीण भागांमध्ये अनेक घरांची रचना अशी असते की, घराच्या आसपास ओला गवत, लाकडे, शेणखत यांचा साठा असतो. अशा ठिकाणी साप लपण्याची शक्यता अधिक असते.
प्रशासनाचे आवाहन :
सजग राहा, सुरक्षित राहा, सर्पदंशापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी, नागपंचमी व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, रात्री झोपताना चटई, उशी, चादर झटकून वापरा, झोपायच्या ठिकाणी जमिनीवर झोपणे टाळा, बूट घालूनच घराबाहेर जा, विशेषतः अंधाऱ्या किंवा गवताळ भागात घराच्या आजूबाजील कचरा, गवत, लाकडांचा साठा काढून टाका झोपताना घराबाहेर दिवा लावा किंवा बॅटरी ठेवा.
साप चावल्यास
ओझे, झाडपाला यांचा वापर न करता त्वरित रुग्णालयात जा
रुग्णाला शक्य तितक्या शांत स्थितीत ठेवा
चावलेले स्थान हलवू नका
शक्य असल्यास सापाचा फोटो काढून डॉक्टरांना दाखवा (परंतु साप पकडण्याचा प्रयत्न करू नका)
सण साजरा करताना जीवन व आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचना पाळून नागपंचमी सुरक्षित आणि शांततेत पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे