तभा फ्लॅश न्यूज/बदनापूर : रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यावर?” हा प्रश्न विचारण्याची वेळ आता बदनापूर शहरातील नागरिकांवर आली आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एकेकाळी विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा हा महामार्ग, आज मृत्यूच्या सावलीत ढकलला गेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, जिल्हा परिषद शाळा, वीज वितरण कार्यालय, हिंदू व ख्रिश्चन स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, खासगी शाळा व महाविद्यालयांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसमोर रस्त्यांची अवस्था अधिकच दयनीय बनली आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातांची नोंद झाली असून, काही घटनांमध्ये बळीही गेले आहेत.
दोन-तीन महिन्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले उचलली जात असली, तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था तशीच की तशीच आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ डागडुजी नव्हे, तर संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण होण्याची आवश्यकता आहे.
वाहतूक खोळंबली, शिक्षण विस्कळीत
या रस्त्यावरील खड्डे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास देत आहेत. रस्त्यावरील अडथळे, नगरपंचायत हद्दीतील हातगाड्या व बेकायदा अतिक्रमणे अपघातांचे प्रमाण अधिकच वाढवतात. वेळोवेळी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असली तरी प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतले जात नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
आता पुरे झाली प्रतीक्षा – हवे ठोस निर्णय!
सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार श्री. नारायण कुचे यांनी या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. नागरिकांचा ठाम विश्वास आहे की, रस्त्याची पूर्णपणे नव्याने डागडुजी किंवा पुनर्बांधणी झाल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.
एकंदरित – रस्ते नाहीत, पण खड्डे ठसठशीत आहेत!
अपघातांची वाढती संख्या, वाहतुकीची अडचण, विद्यार्थ्यांचा होणारा खोळंबा – ही सर्व परिस्थिती पाहता बदनापूरकर आता शांत बसणार नसल्याचे संकेत देत आहेत. प्रशासनाने वेळ न गमावता ठोस निर्णय घेणे, हीच सध्याची काळाची गरज आहे!