तभा फ्लॅश न्यूज/वाशी : पुतण्याकडून काकाला धक्क्या मागून धक्के देण्यात येत आहेत. असाच राज्यात एक आणखी काकाला धक्का बसण्याची शक्यता आहे? काकाच्या जाळ्यातून बडा मासा निष्टून अजितदादा गटामध्ये अडकणार आहे. शरदचंद्र पवारांचे निकटवर्कीय जवळचे नातेवाईक परंडा विधानसभेचे माजी आमदार राहुल मोटे हे तुतारीची साथ सोडून अजित दादाच घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. मोटे यांनी पाच वेळा परंडा विधानसभेमध्ये निवडणूक लढवली आहे. सलग तीन वेळा त्यांनी परंडा विधानसभेचे नेतृत्व केलं.
मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) विद्यमान आमदार माजी पालकमंत्री तानाजी सावंतांनी पहिल्यांदा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत देखील तानाजी सावतांनी थोडक्या मतांनी, राहुल मोटेंचा निसटता पराभव केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मागील शिंदे सरकार मध्ये सावंतांनी राज्याचे आरोग्यमंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले होतं. शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते जवळचे विश्वासू मानले जायचे. परंतु फडणवीस सरकारमध्ये आता त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नारळ दिल्यामुळे त्यांना मंत्री पदापासून लांब राहावं लागलं, तेव्हापासून ते परंडा विधानसभेतील जनतेपासून नॉट रिचेबल आहेत. झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावंतांनी मोटे वर व मोटेंनी सावंतावर जहरीली टीका केल्या होत्या. त्यामुळं त्यांच्यातील हा राजकीय वाद परंडा विधानसभेतील जनतेला पाहायला मिळत होता.
राहुल मोटेच सत्ताधारी पक्षातील, महायुतीत अजित दादा पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याने तानाजी सावंतांची आणि राहुल मोटेंची महायुती म्हणून मैत्री होणार का? असा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर येणाऱ्या सर्व निवडणुका या महायुतीमधूनच एकत्र लढल्या जातील असं जाहीर केलेला आहे. मात्र राहुल मोटेंचा आणि तानाजी सावंतांचा एकमेकांचा राजकीय विरोधक पाहता या निवडणुका एकत्र लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सूत्राने सांगितलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक माजी आमदार राहुल मोटेना आपल्या पक्षात घेऊन या ठिकाणी आपली ताकद वाढवण्यासाठी पक्षप्रवेश घेऊन मोटेंना बळ देणार असल्याचे सांगितली. परंतु विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि शरद पवारांना हा देखील कुठेतरी इशारा दिल्यासारखं असल्याचे सुद्धा सांगितले जाते.
सूत्रांनी सांगितलेल्या प्रमाणे राहुल मोटेंनी अजित पवार गटात प्रवेश केला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सावंत व मोटेची महायुती म्हणून मैत्री होणार का? की महायुतीमध्ये या ठिकाणी वेगळं चित्र पाहिला मिळतं हे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. परंतु मोटेंच्या अजितदादा गटामध्ये पक्षप्रवेशाने हा देखील पुतण्याचा एक काका शरदचंद्र पवार यांना धक्का मानला जात आहे. आता कधी पक्षप्रवेश होणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे.