तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करून तो फिर्यादीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार परत केला आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या प्रभावी कारवाईने नागरिकांच्या सुरक्षेप्रती पोलिसांची सजगता आणि तपासातील कौशल्य अधोरेखित झाले आहे.
फिर्यादी जगदीश भास्कर जाधव (रा. धामनदरी, ता. किनवट) यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कुटुंबासह पुतण्याच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याचवेळी अज्ञात चोरट्याने डुप्लीकेट चावीने घराचे कुलूप उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी 15 मे 2025 रोजी किनवट पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 331(3), 305 अन्वये गुन्हा दाखल (गु.र.नं. 146/2025) झाला.
पोलिसांची कारवाई:
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी जलद कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, किनवट पोलिसांनी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पो.उप.नि. दत्तात्रय मामीडवार, पोहेकॉ तुकाराम वाडगुरे आणि पो.कॉ. नितीन भालेराव यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान माधव हिरामन राठोड (वय 20, रा. धामनदरी) याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 5 लाख 50 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.
मुद्देमाल परत :
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी जगदीश जाधव यांच्याकडे वजिराबाद, नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतपणे परत करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक देविदास चोपडे आणि कर्मचारी उपस्थित होते. या गुन्ह्याच्या यशस्वी उकल आणि मुद्देमाल परत मिळवण्यासाठी तपास पथकाने केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी कौतुक केले. ही कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यास पूरक ठरली आहे.