तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : माहूर तालुक्यात यावर्षी पावसाळा सुरू होताच अधूनमधून जोराचा तर एकसारखी सुरू झालेली पावसाची संततधार रिपरिप आज सकाळपासून शनिवारी विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह दुपारपर्यंत मुसळधार पावसात रुपांतरीत झाल्याने पैनगंगेला प्रचंड पूर आला. परिणामी धनोडा येथील पूलाच्या दोन फूट वरुन पाणी वाहू लागल्याने विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तूटून वाहतूक ठप्प झाली. नदिकाकाठची शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच वरुणराजा काही वेगळ्याच मुढमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
पावसाची सारखी रिपरिप तालुक्यात सर्वत्र सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पाणी साचून शेती चिबडल्या गेली. त्यात आज भरतीवर भर मोठा कहर या उक्तीप्रमाणे तालुक्यासह लगतच्या किनवट, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड,पुसद, महागाव,आर्णी या सर्व तालुक्यात जोरदार मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने विदर्भ मराठवाडा सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढू लागला, आणि सोबतच इसापूर धरणाच्या सांडव्याची 3 वक्रद्वारे 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून सद्यस्थितीत पैनगंगा नदीपात्रात 4988 क्यूसेक्स (141.229 क्यूमेक्स ) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
पैनगंगा नदीसह परिसरातील नाल्यांना प्रचंड पूर आला, नदी,नाले दोन्ही बाजूला दुथडी भरून वाहू लागले. धनोडा येथील पैनगंगेच्या पुलावरून दोन फूटांपेक्षाही जास्त उंचीवरून पुराचे पाणी वाहू लागले. नदीकाठची रुई,हडसणी, केरोळी,शेकापूर,लांजी,नेर, लिंबायत,टाकळी,पडसा ह्या गावची नदीकाठच्या थडीच्या शेतात पूराचे पाणी घूसल्याने शेतकऱ्यांचे जोमात बहरलेली सोयाबीन, कापूस,तूर, मूग, उडीद ही खरीपाची उभी पिके जमीनीसह खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, शासनाच्या महसूल,कृषी व ग्रामविकास विभागाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी,अशी आर्त हाक आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचलेल्या बळीराजाने शासन, प्रशासनाला दिली आहे.
सध्या पावसाचा जोर जरी निवळला असला तरी तालुक्यासह लगतच्या तालुका परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे व इसापूर धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने, माहूर चे तहसीलदार जगताप व पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पैनगंगेच्या काठावरील गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचा सूचना वजा इशारा दिला आहे.