तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : गणेशोत्सव, लग्नसराई, जयंती मिरवणुका आणि कौटुंबिक कार्यक्रम यांचे पर्यायवाचीच झालेल्या डीजे संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आधीच डीजेवर बंदी घातली असताना, आता सर्वोच्च न्यायालयानेही ही बंदी कायम ठेवत गणेशोत्सवादरम्यान डीजे अथवा डॉल्बी वाजवल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत डीजे हा आधुनिक उत्सवांचा ‘स्टेटस सिंबॉल’ बनला आहे. वरातीत, गल्लीबोळात किंवा मोठ्या मिरवणुकांत डीजे वाजलाच पाहिजे अशी सवयच समाजात पसरली आहे. परंतु, या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम गंभीर आहेत. मुंबईसह राज्यभरात नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे डीजेवर नियंत्रणाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
मंगलगाणींनी सुरू होणारा डीजे क्षणातच ‘मुन्नी बदनाम’, ‘व्होडका रोजचा’ अशा गाण्यांकडे वळतो आणि मिरवणुकांमध्ये धिंगाणा घालणारी मंडळी यावर उन्मादाने नाचतात. देवता वा महापुरुषांच्या स्मृतींना अपमानास्पद ठरणारे हे प्रकार चिंताजनक आहेत, अशी समाजातील अनेकांची खंत आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते :
डीजेचा आवाज ४० डेसिबल्सच्या मर्यादेपलीकडे गेला की तो थेट श्रवणशक्ती, हृदयाचे ठोके आणि मानसिक संतुलनावर परिणाम करतो. न्यायालयाने घालून दिलेली ही मर्यादा प्रत्यक्षात पाळली जात नसल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होऊनही डीजेची क्रेझ कमी झाली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर, डीजे किंवा डॉल्बी वाजवल्यास संबंधित मंडळावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.