तभा फ्लॅश न्यूज : भारत हा खेड्यांचा देश. लाखो गावे, वाडी-तांडे आणि शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हीच खरी देशाची ओळख आहे. मात्र, स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटून गेली तरीही ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, हे वास्तव आजही डोळ्यात खुपते.
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही मुख्य यंत्रणा आहे. सरपंच हा गावाचा प्रमुख असतो. त्याने संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे शासनाच्या योजना काटेकोरपणे राबवल्या तर गावकऱ्यांचे जीवनमान बदलू शकते, गावाचा चेहरामोहरा उजळू शकतो.ही संधी म्हणजे गावकऱ्यांच्या सेवेसाठी दिलेली नामी संधी असते.
दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. जाहीरनाम्यांमध्ये गावाच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र कार्यकाळात गावाची खरी समस्याच बाजूला पडते. परिणामी, गावातील नागरिक अद्यापही अभावग्रस्त आणि उदासीन वातावरणात जीवन जगत आहेत.
गाव छोटे असल्याने प्रत्येक समस्या, प्रत्येक नागरिकाची अडचण सरपंचाच्या लक्षात यायला सोपी असते. तरीदेखील योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होत नाही. अनेक ठिकाणी अजूनही पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, आरोग्याच्या समस्या आणि बेरोजगारी कायम आहे.
गावकऱ्यांनी दिलेली ही संधी सरपंचांनी खऱ्या अर्थाने लोकसेवेत वापरली, तरच खेड्यांचा विकास होईल आणि देश खऱ्या अर्थाने मजबूत बनेल.


























