तभा फ्लॅश न्यूज/अंबड : जामखेड येथील खडकेश्वर महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील पाच मंदिरांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा बहाल केला असुन त्या यादीत जामखेड येथील खडकेश्वर महादेव मंदिराचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने खडकेश्वर महादेव मंदिर, जामखेड हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव जारी केला होता.बाराव्या शतकातील खडकेश्वर महादेव मंदिर पश्चिमाभिमुख असुन मंदिराचा तलविन्यास,अर्ध मंडप, तारकाकृती सभामंडप, बाजूला दोन गर्भगृह वजा देवकोष्टे, अंतराळ व तारकाकृती विधान असलेला मुख्य गाभारा असा आहे.मत्स्येंद्रनाथ, सरस्वती, कुबेर,भैरव,चामुंडा, शक्ती देवतांची विशिष्ट जागेवरील शिल्पे, नाग, हंस व घुबडासारख्या प्राण्यांचे वैशिष्ट्यपूर्ण अंकन असलेल्या या मंदिरात उपास्य देवतेची कला साधना व तंत्र मंत्र साधना होत असावी असे मंदिर अभ्यासकांचे मत आहे.