तभा फ्लॅश न्यूज/माहूर : श्री क्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुका देवी मंदिर संस्थान कडून दरवर्षी श्रावण मास समाप्ती निमित्ताने ‘परांजन’ हा विशेष धार्मिक व पारंपारीक सोहळा आयोजित करण्यात येतो. श्री रेणुकादेवी संस्थान कडून परंजन कार्यक्रमास दत्तशिखर येथील महंत महाराजांना गुरुपूजन करण्यासाठी व भोजन करण्यासाठी रितसर आमंत्रण देण्यात येते. यावर्षीही ह्या धार्मिक परंपरेप्रमाणे महंत महाराजांना मानाचे आमंत्रण देण्यात आले.
वासुदेव भारती महाराज,हरिअर भारती महाराज, चिरंजीव भारती महाराज ,शिलानंद भारती महाराज ,माधवगिरी संतोष भारती महाराज,सचिन भारती महाराज ,नितेश भारती महाराज यांनी आज श्री रेणुकादेवी मंदिर येथे उपस्थित झाले.त्यांनी दत्त शिखर संस्थांकडून रेणुका मातेला महाआरती केली.
श्री रेणुका देवी संस्थान कडून या पुजारी प्रतिनिधींचे पाद्यपूजन करून त्यांना पुरणपोळीचे महामिष्ठान्न जेवू घालण्यात आले. यावेळी संस्थानकडून त्यांचा उचित मानसन्मान करण्यात आला. श्रावण मास समाप्ती निमित्ताने ‘परांजन’ ही धार्मिक प्रथा कैक वर्षांच्या कालावधीपासून निरंतर अखंड सुरू आहे. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त, पुजारी यांची उपस्थिती होती.