तभा फ्लॅश न्यूज/चाकूर : तिरू नदीच्या कडेला एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह दि.24 आगष्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या करून मृतदेह बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात असून मृतदेह नदीच्या काठावर असल्याने दुर्गंधी पसरल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळाची माहिती मिळताच चाकूर पोलिसांसह वाढवणा पोलिस ठाण्याचे अधिकारी, एलसीबी पथक व मोबाईल व्हॅन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृतदेह कोणाचा आहे, खून कोणी केला आणि त्यामागील कारण काय याचा शोध घेतला जात आहे.
आठ महिन्यांतील दुसरी घटना
या घटनेमुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. कारण, याच भागात आठ महिन्यांपूर्वी हणमंतवाडी शिवारातही एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्या प्रकरणातील तपास अद्याप लागलेला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा महिला मृतावस्थेत सापडल्याने नागरिकांमध्ये भीती व चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणामुळे वाढवणा-चाकूर परिसर पुन्हा एकदा हादरला असून पोलिस तपासानंतरच या हत्येचे गूढ उलगडणार आहे.