सोलापूर : अवंती नगर व यश नगर परिसरातील सहा कमानी व चौदा कमानी नाल्याचे मूळ प्रवाह पूर्वत करण्याची कार्यवाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. नाले रुंदीकरण व खोलीकरणाची कामे प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. दरम्यान, आज आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाल्याच्या परिसरातील स्थितीची पाहणी करून संबंधित विभागाला नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
सोलापूर महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार 6 कमान व 14 कमान येथे नाल्याचा प्रवाह वळवल्याप्रकरणी त्या परिसरातील शेतकरी व त्यांचे प्लॉट धारक यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये सहा शेतकरी आणि तीन लेआउट धारक यांचा समावेश आहे.
त्यामध्ये उत्तमराव निकाळजे, सुधाकर चिट्ठ्याल, गंगाई सपाटे, रामचंद्र हत्तुरे, सुरेश सपाटे, मनोहर सपाटे, प्रसन्न निकाळजे, प्रशांत निकाळजे, सुधीर देशमुख, प्रवीण निकाळजे, उल्लावा निकाळजे, पूनम निकाळजे, वर्षा कांबळे, विजय जानकर, मीनाक्षी जानकर, जयदेवी जानकर आणि शिवानंद धूम्मा या नागरिकांना नाल्याचा प्रवाह वळविणे अथवा नाल्यावर अतिक्रमण केल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी 6 आक्टोबर रोजी लेखी आदेश काढले होते. यानुसार सहा कमान येथील नाल्याच्या प्रवाहात बदल करुन वळवण्यात आल्याने, नुकत्याचं झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्याच्या प्रवाहातील अडथळे हे यास कारणीभूत ठरत असल्याने, संबंधितांनी हे अडथळे स्वतः हून तीन दिवसांत स्वखर्चाने काढून घेऊन नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा. त्याचे छायाचित्र काढून या संदर्भात अहवाल सादर करावा,असे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले होते.

दरम्यान, आज रविवारी सकाळीच दहा वाजता आंवती नगर व यश नगर परिसरातील सहा कमानी व चौदा कमानी नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामास प्रारंभ करण्यात आला.महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या परिसरातील नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाला नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.या कारवाईदरम्यान उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, किशोर सातपुते, विभागीय अधिकारी जावेद पानगल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई : आयुक्त डॉ. ओम्बासे
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व प्रमुख नाले प्रवाही ठेवणे, त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती करू नये. स्वच्छ व प्रवाही नाला व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

अशी होती यंत्रणा तैनात : उपायुक्त लोकरे हे तळ ठोकून उपस्थित
या नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहेत.कार्यवाहीसाठी आज महानगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तासह ३ मोठे पोकलेन, ४ जेसीबी आणि ६ डंपर यंत्रणा तैनात करण्यात आले होते. २५ पोलीस बंदोबस्त, ४० महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. तीन पथके कार्यरत होती. या कार्यवाहीदरम्यान महापालिका उपायुक्त आशिष लोकरे हे तळ ठोकून होते. तिन्ही पथकास त्यांनी आवश्यक त्या सूचना देऊन ही मोहीम राबविली.
घुसमटलेला श्वास अखेर झाला मोकळा
गेल्या अनेक वर्षापासून अवंती नगर आणि यश नगर परिसरातील सहा कमानी आणि 14 कमानी नाल्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते. त्याचा फटका अतिवृष्टी काळात बसला. या परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. नगरांना पाण्याचा वेढा दिला होता. महापालिकेने आज राबविलेल्या कारवाईमुळे नाले प्रवाहातील घुसमटलेला श्वास अखेर मोकळा झाला.