बार्शी – बार्शी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तब्बल आठ ते बारा दिवस झाले तरी शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांचा संताप उसळला. अखेर आज बार्शी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन छेडले.
संतप्त महिलांनी हातात रिकाम्या घागऱ्या घेऊन रस्त्यावर मांडल्या आणि ‘पाणी द्या, नाहीतर रस्ता बंद राहील!’ असा इशारा दिला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासन आणि नगरपरिषदेकडून वेळोवेळी आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याने लोकांचा संयम संपला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.