मंगळवेढा – महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न सोलापूर जिल्हा वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघटना संयोजक मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी उपराष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस या दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.15 ऑक्टोबर रोजी मंगळवेढयात जिल्हा मेळावा होणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय भगरे यांनी दिली.
सदर मेळाव्यास अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संस्थापक संपादक दिगंबर भगरे भूषविणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे,सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगअप्पा मेडेगार, जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव सचिन बाबर,दै.स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे,जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार महेश पटवर्धन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सदरचा कार्यक्रम जोगेश्वरी मंगल कार्यालय,पंढरपूर-सोलापूर बायपास रोड,मंगळवेढा येथे दुपारी 4.00 वा. होणार आहे.
सदर मेळाव्यास जिल्हयातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय भगरे,उपाध्यक्ष विलास माने,सचिव बाळासाहेब नागणे यांनी केले आहे.