सोलापूर – जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याच्या आमिषाने एक कोटी 87 लाखाची फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून वकीलासह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आयुब साहेबलाल रचभरे (वय 50, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर), दाऊद इब्राहीम पठाण (वय 50, रा. दक्षिण सदर बझार, सोलापूर), सादीक बाबा उर्फ सादीक हुसेनी फुलारी (वय 38, रा. अन्सारी चौक, सोलापूर) आणि सचिन रंगनाथ गायकवाड (वय 46, रा. शिवाजी चौक, दक्षिण कसबा, सोलापूर) अशी न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत गोविंद मल्लिकार्जुन वंगारी (वय 42, रा. प्लॉट नं. 29, रा. कोंडा नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुक व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 नुसार जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद वंगारी यांच्या कोंडा नगर येथील घरात गुप्तधानाचा हंडा असल्याचे आमिष मोहम्मद शेख याने वंगारी यांना दाखविले. त्यानंतर वेळोवेळी मंत्र-तंत्राचा वापर करून वंगारी व त्यांच्या कुटुंबातील लोकांना कोणतेतरी द्रव्य पिण्यास दिले. तसेच जादूटोणा करून गुप्तधन दाखवून ते काढण्यासाठी वंगारी यांच्याकडून 7 जून 2023 ते 30 नाव्हेंबर 2023 या कालावधीत 1 कोटी 87 लाख 31 हजार 300 रुपये घेतले. फेब्रुवारी 2024 मध्ये शेख याने काढून ठेवलेले दोन हांडे वंगारी यांनी उघडून पाहिले. त्यामध्ये फक्त माती असल्याचे दिसून आले.. घरातील जमिनीमध्ये शेख याने दाखविलेले हांडे काढून पाहिले, तिथे फक्त पितळ धातूची झाकणे मिळून आली. अॅल्युमिनियमची पेटी काढून पाहिली तेव्हा त्यामध्येही काहीही मिळून आले नाही. त्यावेळी वंगारी यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. त्यामुळे वंगारी यांच्या फिर्यादीवरुन जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन याचा तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरु आहे.
या गुन्ह्यात मोहम्मद कादरसाब शेख भोंदू बाबाचा शोध घेऊन पोलिसांनी त्यास अटक केली. त्यानंतर पोलिसांनी वकीलासह रविवारी चौघांना अटक केली. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाकडून सुरु आहे.