टेंभुर्णी – टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे आणि टेंभुर्णी येथील सुप्रसिद्ध शितल ग्रुप (कोठारी बंधू) यांच्या वतीने “एक हात मदतीचा” या सामाजिक भावनेतून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत १५५ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या स्कूल बॅग तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. दिनांक १३ ऑक्टोबर रोजी टिळक रोड येथून या साहित्याच्या गाडीचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी ॲड. संतोष कानडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ ताबे, रेवन शिरसागर, महादेव क्षीरसागर, गणेश स्वामी, उमेश ताबे, योगेश ताबे, राजेंद्र कानडे, बाळासाहेब भोज, प्रमोद शिंदे गुरुजी, औदुंबर भोसले, आनंद स्वामी, राजाभाऊ कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर दारफळ, वाकव (घाडगे वस्ती), उंदरगाव, केवड प्राथमिक शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच दारफळ येथील नवभारत विद्यालयातील सुलतानपूर (राहुलनगर) येथील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या.
या वेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे म्हणाले की, “ही आमची मदत नसून आपल्या बांधवांप्रती दाखवलेली आपुलकी आहे. आपत्तीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करण्याची भावना जोपासली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
सदर वितरण सोहळ्याला मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर, शितल ग्रुपचे शुभम कोठारी, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात, माजी उपसरपंच श्रीकांत लोंढे, महादेव स्वामी, गजानन कांबळे, दारफळ सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचा आणि आपत्तीग्रस्तांसाठी एकजुटीचा उत्तम आदर्श ठरला.