सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिरात दीपावलीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील- बेलाटीकर यांनी दिली आहे.
सोलापूर-विजयपूर या महामार्गावरील प्रति आदमापूर म्हणून ओळखल्या जाणार्या बेलाटी येथील बाळूमामा मंदिरात शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी मंदिरात गोमातेच्या पूजनाने वसूबारस व बाळूमामांची आरती, शनिवार, १८ ऑक्टोबर धनत्रयोदशी दिवशी गणेश पूजन यमदीपदान, दीपदान करण्यात येणार आहे. तसेच रविवार १९ ऑक्टोबर रोजी रविवारी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सोमवार २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीनिमित्त भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केलेला दिवस असून यादिवशी पहाटे बाळूमामा मूर्तीस अभ्यंगस्नान करण्यात येणार आहे. मंगळवार २१ रोजी मेंढीपूजन व मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम, दिवसभर भारूड, धनगरी ओव्या सादर होणार असून संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्यानिमित्त मेंढीचे दूध ऊतू घालण्याची परंपरा असून ज्या भागाकडे दूध वाहते, त्या भागात पिके, समृध्दी, भरभराटीचे असते, सांगण्यात येते. दररोज बाळूमामा अन्नछत्र येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केला आहे.