सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते.
आदरांजली कार्यक्रमाच्या सुरवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष, मान्यवर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते डॉ. कलामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना कु.श्रुती वीर हिने वाचन आपल्या विचारांना नवी दिशा देते आणि हाच जीवनाचा मुळ आधार असल्याचे नमुद केले. विद्यार्थी मनोगतामध्ये सुशांत नागटिळक, विनय गिरी, गायत्री कांबळे, श्री महांगडे यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजकालच्या युगात मोबाईल हेच तरूण पिढी साठी पुस्तक बनले आहे ही खंत व्यक्त केली.
सद्य स्थितीत विद्यार्थ्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याकरिता विद्यार्थ्यांनी पुस्तकाला मित्र बनवावे आणि वाचन संस्कृती रुजवावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. माधवी झेंडगे हिने केले. कार्यक्रमाचा शेवट हा कु. प्रणिती चोरमले हिच्या आभार प्रदर्शनाने झाला. सदरील कार्यक्रमास प्रा. सुजाता चौगुले, प्रा. संजय सिरसट आणि प्रथम,द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.