मुंबई – राज्य परिवहन बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऍड.सदावर्ते गटाच्या समर्थकात तुफान राडा झाला. शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून गेले कपडे फाडले तर पाण्याच्या बाटल्या ही फेकल्यामुळे ही बैठक वादळी ठरली. एसटीच्या प्रदान कार्यालयात झालेल्या या बैठकीत
दोन्ही गटाकडून एकमेकावर अर्वाच्य शिव्याचा भडीमार करीत हाणामारी केल्यामुळे दिवसभर चर्चेचा विषय ठरला. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत असताना व्हिडिओ शूटिंग घेतले जात होते. त्यावरून वादाला सुरवात झाल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांकडून नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यात एक संचालक उभा राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणत आहे की, ‘ही संचालक मंडळाची बैठक आहे. याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असं वर्तन कुणीही करू नये.’ मात्र यानंतर बैठकीत राडा सुरु होतो, संचालक एकमेकांकडे हातवारे करून भांडू लागतात. तसेच एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकतात. समोर आलेल्या माहितीनुसर आज सकाळी एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरु होती. यावेळी सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. सदावर्ते यांच्या संचालकांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर मारहाण सुरु झाली. यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले. पोलीसांकडून दोन्ही गटांची तक्रार घेण्याचे काम सुरु आहे.
संचालकांकडून महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप या घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला. या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत.