सोलापूर – सोलापूर शहर व परिसरातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे. महापूर आणि अतिवृष्टीतून बाहेर पडलेले नागरिक ऑक्टोबर हिटमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. ऑक्टोबर हिटचा परिणाम पशुधनावरही होऊ लागला आहे. त्यांच्यातही व्हायरल फिव्हर आला असून त्याचा थेट परिणाम दुधाळ जनावारांच्या दूध उत्पादनावर होत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे.
पशूधनाचे उपायुक्त डाॅ. विशाल येवले यांनी पशूंची काळजी घेण्याचे आवाहन केला आहे. वातावरण बदलामुळे पशुधनाला व्हायरल फिव्हरचा धोका आहे. हिट शॉकमुळे पशुधनाच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. सकाळी दहाच्या आत जनावरे सावलीत बांधावीत.
दुपारच्या सुमारास जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. ऑक्टोबर हिटचा परिणाम पशुधनाच्या पचनसंस्थेवर होत असल्याने सकाळी व सायंकाळी मुबलक हिरवा चारा व सकस चारा द्यावा, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रो बायोटिकची गोळी द्यावी असे डाॅ. येवले सांगितले.