बार्शी – बार्शी शहरातील साईराणानगर परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत एका स्क्रॅप कारखान्याचे मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे १२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
खबरी जबाबानुसार, अमर राम गजघाटे (वय ३५, रा. गाडेगाव रोड, बार्शी) हे स्क्रॅप खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा साईराणानगर येथील गट नं. १०८३/३/३ व १०८३/४/६ या ठिकाणी स्क्रॅपचा कारखाना आहे.
१४ ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने त्यांनी सायंकाळी कारखान्याला भेट देऊन सर्व साहित्य व्यवस्थित असल्याची खात्री करुन घरी परतले. मात्र, रात्री १२ वाजता त्यांच्या शेजारी व मित्र कुलदीप विश्वेकर यांनी फोन करुन कारखान्याला आग लागल्याची माहिती दिली.
गजघाटे यांनी तत्काळ रज्जाक शेख व रमेश दुबे या मित्रांसह घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचता क्षणी आगीचे भयानक स्वरुप दिसले. लगेचच बार्शी अग्निशामक दलाला संपर्क साधून मदतीसाठी बोलावण्यात आले. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने आग काही वेळात नियंत्रणात आणली.
पुढील पाहणीत असे लक्षात आले की, MSEB च्या विद्युत तारा तुटून पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. या आगीत कारखान्यातील ग्रॅंडिंग मशीन, मोटर, लहान ५ ग्रॅंडर मशीन, वजनकाटा, तसेच अंदाजे ३२ टन प्लॅस्टिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.
एकूण अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अमर गजघाटे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबात नमूद केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील चौकशी सुरु केली आहे.