पंढरपूर – ‘शैक्षणिक प्रणाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करणे, विचार आणि कल्पना यांना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी मिळवणे हेच या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान घेणे पुरेसे नाही तर त्यांनी आपले प्रगल्भ विचार, नव संकल्पना आणि तांत्रिक कौशल्य ह्या बाबी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये वापरून समस्या सोडवायला हव्यात. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ विद्यार्थ्यांना अशा संधी आपल्याला उपलब्ध करून देते ज्यातून ते उद्योग, शिक्षण व सरकारी संस्थांसमोर आपली सर्जनशील क्षमता सिद्ध करू शकतात.’ असे प्रतिपादन कोडशेफचे ऑपरेशन्स डायरेक्टर सुरज शर्मा यांनी केले.
येथील स्वेरी इंजिनिअरग कॉलेजमध्ये
नुकतेच ‘स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) २०२५’ महाविद्यालयीन स्तरावर हॅकेथॉन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे उद्दीष्ट स्पष्ट करताना कोडशेफचे ऑपरेशन्स डायरेक्टर सुरज शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार सांगत होते. ही हॅकेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्य, सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले. विद्यार्थ्यांना त्यांचे नवीन प्रकल्प आणि प्रोटोटाईप्स सादर करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक तसेच व्यावसायिक विकास साधला गेला. डॉ. वाय. एम. खेडकर हे मूल्यांकन मंडळाचे प्रतिनिधी म्हणून व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन केले, सर्जनशील कल्पना मांडल्या आणि प्रोटोटाईप्स सादर केले. हॅकेथॉनमध्ये जवळपास ८० हून अधिक संघांनी सहभाग घेतला. या हॅकेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याचा अनोखा अनुभव मिळाला तसेच मूल्यांकन मंडळ समोर आपले प्रकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध झाली. ‘स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५’ हा राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५’ मध्ये सहभाग घेण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरले आहे. महाविद्यालय स्तरावरील अंतर्गत हॅकाथॉनमध्ये निवडलेले ५० संघ राष्ट्रीय स्तरावरील अंतिम हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी शिफारस केले जातील. सर्वोत्तम तीन संघांना एकूण रोख रुपये दहा हजार, प्रमाणपत्र अशा स्वरूपात बक्षिसे वितरीत करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वेरीच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
सदरचा कार्यक्रम स्वेरीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ. डी. ए. तंबोळी, एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. एम. वाय. शेख, प्रा.ए. ए. मोटे, डॉ. अलोक कुमार, प्रा. आर. पी. जाधव, प्रा. एस.एस.खोमणे, प्रा. एस. एस. गावडे, प्रा.के. पी. कोंडूभैरी, स्वेरीच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ.दिग्विजय रोंगे, स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकेथॉन चे समन्वयक प्रा. डी. टी. काशिद आदी प्राध्यापकांच्या सहकार्याने पार पडला.