पंढरपूर – कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या १० हजार टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने १० हजार मे.टन प्रति दिन गाळप क्षमता गाठली आहे आणि पोटॅश उत्पादन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी आणि इतर सुविधा देण्याचे काम कारखान्याने केले आहे. इथेनॉल करताना निर्माण होणाऱ्या उपउत्पादनातून सीबीजीसारखे अतिशय स्वच्छ इंधन तयार करता येते. साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी उत्पन्नाचे साधन ठरत आहेत. त्यामुळे कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येकाशी त्याच्या भाषेत संवाद साधणारे त्यांचे शिस्तप्रिय, कणखर व्यक्तिमत्व होते. सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा करण्याचे कार्य त्यांनी केले. अनेक संस्था उभ्या करून या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिले आणि विश्वस्ताच्या भावनेतून कार्य केले. प्रत्येक संस्था सचोटीने चालविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचा स्पर्श लाभलेल्या संस्था यशस्वी ठरल्या आहेत. अत्यंत संवेदनशीलतेने समाजात परिवर्तन घडविणारी प्रत्येक संस्था त्यांनी उभी केली, त्यात पारदर्शकता आणली आणि त्यातून सामान्य माणसाचे कल्याण साधले. जीवनाच्या अखेरपर्यंत कर्तव्यभावनेने त्यांनी कार्य केले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर एसटी फायद्यात येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्यासोबत काम करताना आपले जीवन समृद्ध झाले, अशा शब्दात श्री.फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
————————–
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू
राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्री.फडणवीस म्हणाले.
—————————-
कै. परिचारकां बरोबर काम करण्याची संधी मिळाली : मुख्यमंत्री फडणवीस
कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना श्री.फडणवीस म्हणाले, त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्यासोबत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. समाजात अशाप्रकारचे निस्पृह नेते फार थोडे पहायला मिळतात, स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी मोठेपण मिळविले. त्यांना सर्व मोठे मालक म्हणत असले तरी पंढरीच्या पांडुरंगाला मालक समजून सेवेकऱ्याच्या भावनेने त्यांनी आजन्म सामान्य माणसाची सेवा केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय हे मोठ्या मालकांनी कमावलेले प्रेम आहे. ज्यांची सत्ता समाजाच्या मनावर असते ती कायम टिकते, म्हणूनच सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी आले, असे ते म्हणाले.
————————-
कारखान्याने आज १० हजार मे.टनाचा टप्पा गाठला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.परिचारक यांनी केले. कै. सुधाकरपंत परिचारक यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी आपले आयुष्य वेचले. जिल्ह्यात हरितक्रांती करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रयत्न केले. समाजासाठी सर्वकाही अर्पण करणारे त्यांचे जीवन इतरांसाठी आदर्शवत होते. नागरिकांच्या इच्छेखातर त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे २० हजार सभासद असून कारखाना नफ्यात आहे. आज १० हजार मे.टनाचा टप्पा कारखान्याने गाठला असल्याची माहिती त्यांनी दिली.
—————————–
एक कोटींचा निधी सुपूर्द
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला
—————–
या मान्यवरांची होती उपस्थिती
कार्यक्रमास राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, दिलीप सोपल, बाबासाहेब देशमुख, राजू खरे, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, शहाजी पाटील, दीपक साळुंखे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यासह उमेश परिचारक, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद, नागरिक उपस्थित होते.