सोलापूर : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महापालिका प्रशासनाने सानुग्रह अनुदान आणि सण अग्रीम (ॲडव्हान्स) यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदा महापालिका सेवकांना १२ हजार ५०० रुपये ऍडव्हान्स आणि ३ हजार ६०० रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी याचे संपूर्ण नियोजन पूर्ण केले आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सानुग्रह अनुदान आणि सण अग्रीम अदा करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याचे संपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांना दिले होते. दरम्यान, महापालिकेच्या विविध कामगार संघटनांकडून अधिकाधिक सानुग्रह अनुदान आणि सण आगरीन अदा करण्याची मागणी झाली होती. यातून सन २०२५- २६ या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सण अग्रीम हे १२ हजार ५०० रुपये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ९ हजार रुपये देण्यात आले होते. यानुसार अदा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तर यंदाच्या वर्षी दिवाळी सणानिमित्त महापालिकेच्या अधिकारी जे सध्या वेतन स्तर एस-१४ व त्यापेक्षा जास्त आहेत अशांना वगळून कायम सेवकांना तसेच महापालिकेतील रोजंदारी, बदली, मानधन वरील सेवक, बालवाडी शिक्षिका, सेविका, शिवण वर्ग शिक्षिका यांना दिवाळी सणासाठी तीन हजार सहाशे रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार असून याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसाच्या आत कर्मचाऱ्यांना या रकमा अदा करण्याचे काम पूर्ण होणार आहे.
या देय रकमा कोणत्याही परिस्थितीत दुबार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सानुग्रह अनुदान व सन अग्रीम रखमा वेतनाप्रमाणेच अंतर्गत लेखापरीक्षक यांच्याकडून तपासणीअंती बँकेमार्फत अदा करण्याची कार्यवाही ठेवण्यात यावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना या रकमा दिवाळी सणापूर्वी मिळतील याची जबाबदारी सर्व संबंधित शाखा व खाते प्रमुख यांनी घ्यावी. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित खाते प्रमुख किंवा शाखाप्रमुख हेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
तर अशा सेवकांना रकमा होणार नाही अदा
जे कर्मचारी ३१ मार्च २०२५ रोजी सेवेत होते, त्यांनी सन २०२४-२५ या वर्षात किमान ६ महिने सेवा केलेली आहे, अशा सेवकांना त्यांचे सेवेचे प्रमाणात सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार आहे. मागील वर्षांमध्ये ६ महिने निलंबित असलेल्या सेवकांना तसेच मागील आर्थिक वर्षात ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ गैरहजर असलेल्या सेवकांना सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करण्यात येऊ नये, असे परिपत्रक मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी काढले आहे.
महापालिकेचा होणार ४ कोटी २५ लाखांचा खर्च
यंदाच्या दिवाळी सणासाठी महापालिकेच्या सेवक कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि ॲडव्हान्स वितरित करण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेतील कायम आणि नियमात बसणाऱ्या सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार असून त्यावर २ कोटी ५० लाख रुपये तर नियमात बसणाऱ्या सुमारे ३ हजार ५०० सेवक- कर्मचाऱ्यांना सानुग्रह (बोनस) ३६०० रुपये देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये असे दोन्ही मिळून ४ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.