सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात केवायसी प्रक्रियेमुळे अडथळा निर्माण होत असल्याने आधार लिंकच्या आधारे नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी खा. प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सन २०२५ सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे आलेल्या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे तसेच निवारा व्यवस्थेचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. बाधित शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरीकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा होण्यासाठी केवायसी प्रक्रिया करण्यास सांगण्यात येत आहे. परंतू मागील चार दिवसापासून सर्व्हर बंद असल्यामुळे त्यांचे केवायसी होऊ शकत नाही. तरी ही केवायसीची प्रक्रिया न करता आधार लिंकप्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात याव्यात पुढील आठवड्यात दिवाळीच्या सुट्टी आहे या कालावधी मध्ये बँका बंद राहणार आहेत. तरी सणासुदींच्या अगोदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरीकांना नुकसान भरपाईची रक्कम केवायसी प्रक्रियेला विलंब लागत असल्यामुळे आधार लिंकच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरीता संबंधितांना आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.