सोलापूर – विविध विषयावरचे वाचन मी सतत करत गेले. माझे चुलत बंधू आणि माझ्यात वाचनाची स्पर्धा असायची..रात्र रात्र जागून आम्ही वाचायचो, त्यावर चर्चा करायचो त्यातून मी घडत गेले. खऱ्या अर्थाने मला वाचनाने समृद्ध बनवले प्रत्येकाने वाचनाची सवय अंगी बाणवावी. याकरिता प्रत्येक महिन्यातून एखादा कार्यक्रम वाचनाचा घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले. मनोगताच्या शेवटी त्यांनी गुलजार यांची ‘ किताबे ‘ ही गझल आपल्या सुमधुर आवाजात सादर केली.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मोनिका सिंह ठाकुर बोलत होत्या. प्रारंभी त्यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध ग्रंथांचे पूजन यावेळी करण्यात आले. आपल्या भाषणात त्यापुढे म्हणाल्या की वाचनाच्या माध्यमातून आपण थोर व्यक्तींच्या अनुभवांचे आणि ज्ञानाचे भागीदार बनतो. त्यामुळे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, दिवसातला किमान एक तास तरी आपल्या आवडीचे, माहितीपूर्ण आणि सकारात्मक विचार देणारे पुस्तक वाचा. हेच खरे वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आहे.”
याप्रसंगी रोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकारी आणि मराठी भाषा सदस्य सचिव अंजली मरोड, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार सरस्वती पाटील, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य तथा सहायक कुलसचिव पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ डॉ. शिवाजी शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, आपल्या सहकाऱ्याला मदत करणे, शाळेतील मुले व तरुण वर्गाना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा डॉ. कलामांचा छंद होता. त्यामुळे कलामांच्या जीवनातून आपण सर्वांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. म्हणून वाचन संस्कृती टिकली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने नित्यनेमाने काहीतरी वाचन करावं, चिंतन, मनन करावं आणि अनुभवाची देवाणघेवाण करावी असे सांगितले.
उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा सचिव अंजली मरोड आपल्या भाषणात म्हणाल्या की, प्रत्येकाने आपल्या आवडीची पुस्तके वाचावीत. त्यामध्ये ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्या इतरांना सांगाव्यात. यामुळे अनुभवांची आदानप्रदान होते. त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडवून आणावा. यासाठी प्रत्येकाने काय वाचले याचे सिंहावलोकन करावे. पुढच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रत्येकाने किमान १२ पुस्तके वाचावीत असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी केले तर आभार श्रीकांत कुलकर्णी यांनी मांनले, या प्रसंगी सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती पल्लवी बागुल, महसूल सहाय्यक मुबीन कडेचुर, मसाप जुळे सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, कोषाध्यक्ष अविनाश कामतकर, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.