बार्शी – बार्शी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मौजे शेंद्री फाटा येथे सापळा रचून जनावरांची अवैध वाहतूक करणारा एक इसम पकडण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी बोलेरो पिकअपमधून पाच जर्सी जातीच्या गायी जप्त करुन चालकाला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोतीराम बोंदर (पोकॉ. क्र. 747) हे सध्या अपघात पथकात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आज पहाटे सुमारे ५ वाजता त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुईवाडी ते बार्शी मार्गावरुन पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. MH-45 AX-0156) मधून जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत आहे.
यावरुन बोंदर व त्यांचे सहकारी पोकॉ. क्र. 2070 वाकळे यांनी शेंद्री फाटा परिसरात सरकारी वाहनासह सापळा रचला. सुमारे ६ वाजता सदर बोलेरो पिकअप दिसताच पोलिसांनी हाताच्या इशाऱ्याने वाहन थांबवले. चालकाने आपले नाव मुजम्मील शाकीर शेख (वय २०, रा. व्यंकटनगर, अकलूज, ता. माळशिरस) असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता बोलेरोच्या मागील भागात पाच जर्सी जातीच्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गायी अत्यंत दाटीवाटीने भरलेल्या अवस्थेत आढळल्या. जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा अरुंद जागेत त्यांना बांधण्यात आले होते तसेच चारा, पाणी वा औषधाची कोणतीही सोय नव्हती.
यावरुन पोलिसांनी सदर बोलेरो पिकअप व जनावरे ताब्यात घेऊन बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणली. यावेळी जर्सी जातीच्या ५ गायी अंदाजे किंमत ₹३०,०००/- बोलेरो पिकअप (MH-45 AX-0156) – अंदाजे किंमत ₹२,००,०००/- एकूण जप्ती मूल्य रु. २,३०,०००/- जप्त करत या प्रकरणी आरोपी मुजम्मील शाकीर शेख याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरु आहे.