सोलापूर – राज्यात असलेला जुना कांदा अद्याप शिल्लक असल्याने ऐन दिवाळीत कांद्याच्या दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. अशातच कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक बाजार पेठेत आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांत जुना उन्हाळी कांद्याचा साठा अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यात आता कर्नाटकातील खरीप हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाली आहे. लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा होणार असल्याने कांद्याचे दर घसरलेलेच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात जुना उन्हाळी कांद्याचा साठा आहे. सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रामुख्याने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांच्या कालावधीत कांद्याची मोठी आवक असते. दररोज सरासरी ६०० ते ८०० ट्रक कांदा शेतकऱ्यांकडून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. या बाजारपेठेत सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या मराठवाडा व कर्नाटकातून कांद्याची आवक होते. या संपूर्ण परिसरातील खरीप कांदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात बाजारात आवक होते. खरीप कांदा यावर्षी उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे.
सध्या मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
सोलापूरसह राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दरातील या संभाव्य घसरणीमुळे चिंतेत भर घालणारी आहे. सध्या सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा प्रतिक्विंटल सरासरी १००० ते १५०० रुपये दराने विक्री होत आहे. सध्या मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
– नेताजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी
बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे.
– सादिक बागवान, कांदा अडत व्यापारी
बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून स्वतःचे उत्पादन वाढवत आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. यामुळे भविष्यात भारताचा कांदा निर्यात बाजार धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणी कांदा निर्यातदार संघटनेने केली आहे.