पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने संचालित गोशाळा परिसरात आज वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुबारस निमित्त गोमातेची विधिवत पूजा, आरती, पुष्पहार अर्पण व नैवेद्य अर्पण अशा पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला. गोशाळेतील सर्व गाईंची स्वच्छता, सजावट तसेच परिसर सुशोभित करण्यात आला होता. भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
वसुबारस हा दीपावलीतील पहिला दिवस असून गोमातेच्या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने गोसेवा, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या वेळी समिती सदस्य जळगावकर महाराज, नडगिरे ताई, तसेच समितीचे अधिकारी, कर्मचारी व अनेक भाविक उपस्थित होते.