सोलापूर – वसुबारसनं, प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या मंगलमय अशा दीपावलीस शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी गाय-वासराचं मनोभावे पूजन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अशोक चौक येथील मार्कंडेय जलतरण तलावाच्या बगीचामध्ये गोमातेचे यथोचित पूजन करण्यात आले. यावेळी सुवासिनी महिलांनी
गाय वासराचे पूजन करून त्यांना आवडते खाद्य पदार्थ खाऊ घालण्यात आले.
प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपावली. दीपोत्सव
म्हणजे भारतीय संस्कृती मधील सर्वात मोठा सण. तेजोमय, मंगलमय आणि चैतन्यमय अशी दीपावली म्हणजे बालगोपाळां पासून ते अबालवृध्द पर्यंत सर्वांचा आवडता सण. अत्यंत आतुरतेनं दीपावलीची प्रत्येकजणचं वाट पाहत असतो. वसुबारसला गोवत्स व्दादशी असं ही म्हटलं जातं.
दीपावलीच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी विविध गोशाळेत गाय वासराचं पूजन करण्यात आलं. सायंकाळी सोलापूर शहर आणि परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात, आनंदात गोधनाचं अर्थात गाय आणि तिच्या वासराचं मनोभावे पूजन करण्यात आलं. त्यानंतर या दोघांनाही ओवाळून, त्यांना नैवेद्य देण्यात आला.
दरम्यान, महिलांनी वसुबारस निमित्त दिवसभर उपवास ठेवला होता . सायंकाळी गाय-वासराचं मनोभावे पूजन करुन मुला-बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुख – शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली . या पूजना नंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन दिवसभराचा उपवास सोडण्यात आला. महिला भगिनी या दिवशी गहू तसचं मूग हे खात नाहीत. तसचं दूध अथवा दुधापासून बनवलेले पदार्थ देखील खात नाहीत.असे पुरोहितांनी सांगितले.