बार्शी – इतरांना मदत करत समाजासाठी जीवन जगण्यामध्ये खरा आनंद आहे. भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून शशिकांत जगदाळे यांनी गरजूंसाठी अतिवृष्टीचे भान ठेवत केलेला मोफत रक्त प्रदान सप्ताह आदर्शवत असून सतत दहा वर्ष चढत्या क्रमाने प्रगतीपथावर राहणारी संस्था निर्माण करणाऱ्या शशिकांत जगदाळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरव उद्गार विधान परिषद सदस्य व तर्पण फाउंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय यांनी काढले.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात भगवंत ब्लड बँक आयोजित शेतकरी मोफत रक्त प्रदान सप्ताह व फिरते रक्त संकलन केंद्राचा शुभारंभ व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वनाथ फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. श्रेया भारतीय उद्योजक व बाजार समिती प्रशासक नानासाहेब राऊत, माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पत्नी सौ. कविताताई राऊत, बाजार समिती माजी सभापती रणवीर राऊत, सौ. कोमल विजय राऊत, मृणाल रणजीत राऊत, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रमेश पाटील उपस्थित होते.
यावेळी भारतीय दांपत्य व मान्यवरांच्या हस्ते शिवसृष्टी प्रांगणात फिरते रक्त संकलन केंद्राचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये संयोजक व भगवंत बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे म्हणाले, भारतीय हे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून मला लाभलेला परिस स्पर्श आहे. त्यांनी दिलेल्या सामाजिक जाणीवांच्या वैचारिक दिशेनुसार काम करत आहे. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी भगवंत ब्लड बँकेच्या स्थापनेपासून खंबीर पाठबळ दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून काम करण्यास सांगितल्यामुळे अतिवृष्टी काळात झालेली हानी लक्षात घेऊन सर्वांसाठी एक सप्ताह मोफत रक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिली. आता प्रत्येकाच्या घरी जाऊन रक्त संकलन केले जाणार आहे. रक्तदानाची इच्छा असलेल्या व्यक्तींनी केलेल्या कॉलवर त्यांच्याशी संपर्क साधून रक्त संकलन केले जाईल, असे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तथा पिंपळगावचे पालक अतुल कुलकर्णी म्हणाले, भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून शशिकांत जगदाळे यांनी केलेल्या कामामुळेच आज वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर येथे आले आहेत. शेतकरी जागृत होणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा निर्मिती बरोबरच शेतीचा विकास आणि रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. तसेच गरजूंसाठी आयोजित मोफत रक्त प्रदान सप्ताहचा व मोबाईल यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कृषी बाजार समितीचे प्रशासक नानासाहेब राऊत म्हणाले, शशिकांत जगदाळे हे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी घडवलेला युवक आहे. शशिकांत हा आमच्या परिवाराचा घटक आहे. त्यांनी ग्रामीण भागातील युवकांसमोर आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे. भारतीय दांपत्य व जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी समाजसेविका स्वनाथ फाउंडेशन संस्थापक डॉ. श्रेया भारतीय म्हणाल्या, जगदाळे शशिकांत जगदाळे यांनी दहा वर्षात रक्तदानाचं महत्त्व ओळखत मोठे विश्व निर्माण केला असून गरजूंना रक्त उपलब्ध करुन देण्यामागच्या वेगवेगळ्या कल्पना मांडत भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून होत असलेले काम अतिशय समाजोपयोगी आहे. या कार्यक्रमाला आल्यामुळे आजोळी आल्याची भावना मनात आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी भारतीय दांपत्याचा प्रतिमा देऊन संयोजकाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत कथले माजी, संतोष निंबाळकर, केशव घोगरे, भाजपा तालुका प्रमुख मदन दराडे व बबन गडदे, संदेश काकडे, पंढरपूरचे शिक्षण संस्था चालक डॉ. बी.पी. रोंगे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे, जन्मभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक नानासाहेब धस, सचिव स्वप्नील धस आदी मान्यवर उपस्थित होते. नीता देव यांनी सूत्रसंचालन केले तर किरण कोकाटे यांनी आभार प्रदर्शन केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट मोठे असून या काळात भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून शशिकांत जगदाळे गरजूंना मोफत रक्त देण्यासाठी करत असलेला उपक्रम व रक्तदात्यांसाठी मोबाईल व्हॅन उपक्रम कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील युवकांसाठी युथ आयडॉल असणारे शशिकांत जगदाळे यांची वाटचाल कौतुकास्पद असून कायम भगवंत बँकेच्या पाठीशी भविष्यातही राहणार आहे, अशा शुभेच्छा माजी आमदार राजभाऊ राऊत यांनी यावेळी आपल्या संदेशामध्ये दिल्या.