सांगोला – ग्रामीण भागातील जनतेचे जगणे शांततामय व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाच्या पुरस्काराचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी व सुज्ञ नागरिकांनी हे अभियान परिश्रम पूर्वक राबवून सामान्य माणसाचे जीवनमान उंचवावे अशी अपेक्षा उप.कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी वाढेगाव, ता. सांगोला येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी स्मिता पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांचे सरपंच कोमल डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे, सदस्य महादेव दिघे, संगमेश्वर घोंगडे, दत्ता शिनगारे, सागर ऐवळे यांनी स्वागत केले. त्यानंतर अभियानाचे संचालक वैजिनाथ घोंगडे यांनी गावांमध्ये झालेल्या कामाची, करावयाच्या कामाची व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती दिली. त्याबरोबरच पंचायत समितीचे विकासाधिकारी अमोल तोडकरी, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ होळ यांच्याकडूनही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
गावामध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या तीर्थ क्षेत्र विकासकामांची व पर्यटन विकास कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून गावांमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला भेट दिली. गावामध्ये असणाऱ्या व्यायाम शाळा व सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केली. तसेच गावामध्ये सुरू असलेल्या श्रमदानाच्या कामात सहभागी होऊन त्यांनी महिलांच्या बरोबर श्रमदान केले. श्रमदानानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत येणाऱ्या अडचणीवर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर समाधान कारक उत्तरे दिली. तसेच ग्रामपंचायत कर वसुली वेळेत करावी व घरकुलाची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. त्याचबरोबर गावामध्ये प्लास्टिक वापरास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पंचायत समिति कृषि अधिकारी निखिल बाबर, अभियानाचे सर्व संचालक, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, महिला बचत गटाच्या प्रतीनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.