सोलापूर – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यात महापूर येऊन सर्व शेत जमीन वाहून गेल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. अशा हालाखीच्या आणि दुःखी प्रसंगात सरकारने शेतकऱ्यांना आणि बाधितांना केवळ निधी जाहीर केला. परंतु तो निधी अत्यंत तोकडा असून तो देखील आत्तापर्यंत संबंधित शेतकरी आणि बाधितांच्या खात्यावर वर्ग केला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्यावतीने यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषद येथे मूक आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या आंदोलनासाठी खा. धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, एकीकडे शेतकरी आणि पुराने बाधित झालेल्या नागरिकांच्या समोर अनंत अडचणी असताना सत्ताधारी भाजप मुंबईमध्ये प्रवेशोत्सव करण्यात मग्न आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लक्ष द्यावे. तातडीने शेतकऱ्यांना तसेच बाधित पूरग्रस्तांना कोणतीही अट न लावता सहायता निधी खात्यात वर्ग करावा.
यावेळी आमदार उत्तम जानकर, शहराध्यक्ष सुधीर खराटमल, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आदींसह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होते.