टेंभुर्णी : पुणे–सोलापूर महामार्गावर शिराळा गावाजवळील जय मल्हार हॉटेलच्या समोर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालजी पालतुराम कानोजिया (वय ३५, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील सिमेंट बल्कर (क्रमांक MH12XM3880) घेऊन सोलापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH10CR5742) चालक संदीप राजाराम पाटील (वय ३८, सध्या रा. टेंभुर्णी, मूळ रा. कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी निष्काळजीपणे चालवून डिव्हायडरला धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन बल्करला समोरून धडकली.

धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात चालक संदीप राजाराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी बाळकृष्ण परमेश्वर गुरव (रा. कुरुल, ता. मोहोळ) आणि बल्कर चालक लालजी कानोजिया गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातात बल्कर गाडीच्या समोरील भागाचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, गु.र.नं. ६६०/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम १०६, २८१, १२५(ब), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार जगताप (ब.क्र. ११८६) करीत आहेत.