अकलूज – ऐन दिवाळीत रेशन दुकानदारांना अद्यापही मार्जिन न मिळाल्याने त्यांच्यावर संक्रांत ओढवली आहे त्यामुळे त्यांना यंदा मार्जिनविनाच दिवाळी करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रेशन दुकानदारातून संतप्त भावना ऐकायला मिळत आहेत.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ,अन्न व नागरी पुरवठा विभागाचे वित्तीय सल्लागार उपसचिव भगवान घाडगे,महाराष्ट्र राज्याचे अन्न राज्य आयोग अध्यक्ष महेश ढवळे,यांना सोलापूर ग्रामीण भागातील रेशन दुकानदार यांना दिपावली सणानिमित्त मार्जिन मिळावे म्हणून गेले कित्येक दिवस निवेदन देऊन शासनाकडे अतोनात पाठपुरावा करत आहेत.
या सह तालुक्यातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार,माजी आमदार, यांचा मार्फत सुद्धा शासनाकडे गेले चार महिन्यांपासूनचे रेशन दुकानदार यांना एक रू सुद्धां मार्जिन मिळालेले नाही.म्हणुन किमान आता तरी दिवाळी सारख्या मोठ्या सणाला तरी रेशन दुकानदार यांचे हक्काचे व कष्टाचे मार्जिन मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न संघटनेचे वतीने चालू आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक हे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे वित्तीय सल्लागार उपसचिव भगवान घाडगे यांच्याकडे मार्जिन बाबत वारंवार दूरध्वनीवरून संपर्क करत आहेत.
परंतु मार्जिन फाईल राज्य सरकार ते केंद्र सरकार यांच्यामध्ये चार ते पाच ठिकाणी व्हेरिफिकेशन साठी जात असते असे भगवान घाडगे यांनी सांगितले आहे.यावर जिल्हाध्यक्ष यांनी आता दिवाळी सुट्टी चालू होत असल्याने मंत्रालयाकडून या दोन दिवसात तरी रेशन दुकानदार यांचे मार्जिन जमा करून रेशन दुकानदार यांची दिवाळी गोड करावी अशी कळकळीची मागणी महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेच्या वतीने केली आहे.