सोलापूर : वारांगना म्हणजेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला. समाजाने त्यांना नेहमीच “वेगळं” ठेवलं. त्यांच्या आयुष्यात सण,आनंद, साजरीकरण याला जागाच नव्हती. पण संभव फाउंडेशनने ही भिंत मोडून त्यांच्याही आयुष्यात दिवाळीचा प्रकाश नेला आहे.दरवर्षीप्रमाणे सोलापूरातील तरटी नाका परिसरात या भगिनींसोबत फटाके, झाड, मिठाई, फराळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “मायेची साडी” देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा,आनंदाचा,नात्यांच्या उबदार स्पर्शाचा सण. पण समाजाच्या काठावर जगणाऱ्या काही भगिनींसाठी हा सण अनेक वर्षांपासून केवळ अंधारच घेऊन येत होता. या अंधारात एक छोटासा दिवा प्रज्वलित करण्याचं काम दरवर्षी संभव फाउंडेशन करत आहे “एक दिवा वारांगनांच्या दारात” या उपक्रमातून करते.
या दिवशी कोणतीही तटबंदी राहत नाही. आम्ही आणि वारांगना भगिनी एकत्र बसतात, हसतात, एकमेकींना शुभेच्छा देतात आणि थोड्या वेळासाठी का होईना त्यांना आपलेपणाचा अनुभव मिळतो. या भगिनींच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच या उपक्रमाचं खरं यश आहे.
या उपक्रमामागचं तत्त्व साधं आहे “प्रकाश फक्त आपल्या घरातच नाही, तर अंधाऱ्या कोपऱ्यातही नेला पाहिजे.” समाजाने ज्यांना आयुष्यभर उपेक्षित ठेवलं, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणं म्हणजे त्यांना सन्मानाचं स्थान देणं आहे.
संभव फाउंडेशनच्या पुढाकाराने गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू आहे. “या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी खरी दिवाळी असते,” या उपक्रमामुळे समाजात एक नवा विचार निर्माण होतो समता फक्त शब्दात नाही, कृतीत उतरली जाते.