पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाल्यापासून नाशकात अनेक नाट्यमय घडमोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता स्वराज्य संघटना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळेल, असा खळबळजनक दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये पुन्हा एक नवे वळण आले आहे. बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील रंगत आता आणखी वाढणार आहे. भाजप सुरेश पवार यांना पाठिंबा देणार का? हा प्रश्न निर्माण झाला असून पाठिंबा दिल्यास ही निवडणूक तिरंगी होणार आहे.
नाशिक पदवीधरमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले असून या निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यापासून या निवडणुकीचे चित्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे. तांबेंप्रमाणेच शुभांगी पाटील ह्या देखील पाठिंबा मिळवण्यात आघाडी घेत आहेत. तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा असतानाच आता स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराने केलेल्या दाव्यामुळे राजकारण बदलाची चिन्हं आहेत.
भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी दावा केला आहे. तसेच संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून उद्यापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, असे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशकात उद्या काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.