सोलापूर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल जोमात सुरू असून आत्तापर्यंत बँकेने १ हजार कोटींच्या व्यवसायाचा तर ६ हजार कोटी ठेवींचा पल्ला गाठल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. तशा आशयाचे फलक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत कार्यालयासमोर झळकवण्यात आले आहेत. या फलकावर कुशल प्रशासक म्हणून कुंदन भोळे, बँकेचे तारणहार अध्यक्ष संजय शिंदे आणि सचिव राजेश गवळी यांचे फोटो लावण्यात आल्याने सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक प्रशासकीय इमारत चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उगम झाला. परंतु बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळांच्या कारभारामुळे बँकावर थकित कर्जदारांची मांदियाळी वाढली. यामुळेच शासनाने या बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली. प्रशासकाच्या नेमणुकीनंतर बँकेत चाललेल्या अनेक गैरप्रकारांना आळा बसला. त्यामुळे आता सद्यस्थितीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पत वाढत आहे.
बँकेने कर्जदारांकडून थकीत कर्जाची रक्कम वसूल केली असून, बँकेचा व्यवसाय देखील वृद्धीस लागलेला दिसत आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारती बाहेर दीपावलीच्या शुभेच्छापर बॅनरमध्ये प्रशासक कुंदन भोळे यांच्या कार्याचे कौतुक केलेले दिसून येत आहे.
प्रशासक नेमणुकीवर शासनाचा अंतिम निर्णय
शासनाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वावर प्रशासकाचा अंकुश ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानंतरचा यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा बँकेवर प्रशासक राज्य कायम असणार असल्याचे दिसून येत आहे.
बँकेचा पत वाढत आहे
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक कार्यकाळ किती दिवस राहणार याबाबत राज्य शासन अंतिम निर्णय घेईल. मात्र सध्या तरी बँकेवर प्रशासक कार्यकाळ आहे. याकाळात बँकेचे व्यवहार आणि ठेवी यांच्यात सुधारणा होत असल्याने बँकेचा पत वाढत आहे.
कुंदन भोळे, प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार, शेतकरी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर बँकेचे प्रशासक अध्यक्ष आणि सचिव यांचे बॅनर झळकल्याचे दिसत आहे.