बार्शी – सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाच्या याद्या अपलोड करण्याचे काम जोरात सुरु असून, या कामात बार्शी तहसील कार्यालयाने एक आदर्श निर्माण केला आहे.
काल सुट्टीचा दिवस असतानाही बार्शी तहसील कार्यालय उघडे ठेवून याद्या अपलोड करण्याचे काम सुरु होते. स्वतः तहसीलदार एफ. आर. शेख हे कार्यालयात उपस्थित राहून कॉम्प्युटरवर बसून कामाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही आमचं १००% देण्याचा प्रयत्न करत आहोत. जितक्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होतील, तितक्या लवकर त्यांना शासनाची मदत मिळेल, असे शेख यांनी स्पष्ट केले.
आज सकाळपर्यंत बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या मोठ्या प्रमाणात अपलोड झाल्या असून, एकूण ३२,९६७ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
बार्शी तहसील कार्यालयाने केलेले हे काम अत्यंत उत्कृष्ट, नियोजनबद्ध आणि वेळेवर पूर्ण करण्यात आले असून, यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बार्शी तालुका क्रमांक एक ठरला आहे. हे यश संपूर्ण तहसील प्रशासनाच्या संघटित कामगिरीचे आणि तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या कार्यक्षम मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे.