सोलापूर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना खरेदीची चाहूल लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठा गजबजलेल्या दिसून येत आहेत. मधला मारुती, टिळक चौक, कुंभार वेस, अशोक चौक, जुळे सोलापूर येथील बाजारात खरेदीचा धूम पहावयास मिळत आहेत. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोबाईल, वाहन, फ्लॅट, प्लॉट, होम ॲक्सेसरीज, सोने अशा विविध प्रकारच्या खरेदीला दिवाळीचा पाडवा हा शुभ मुहूर्त मानला जातो. दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी
सराफ बाजार, खाऊ गल्ली, मोबाईल शोरूम, होम ॲक्सेसरीज शोरूम आणि विविध ऑटोमोबाइल शोरूममध्ये नागरिक गर्दी करत आहेत. आवडते मोबाईल गृहउपयोगी वस्तू आणि दुचाकी चारचाकी वाहन बुक करण्यासह त्यांचे वितरण करण्याचेही कामकाज सुरू झालेले दिसत आहे.
दरम्यान, सराफा बाजारात सोन्याच्या दारात दोन हजार तर चांदीच्या दरात पाच हजारांची घसरण झाली आहे. अशा अवस्थेत सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांचा मोर्चा वळाला आहे. परंतु ग्राहक पूर्वीच्या तुलनेत सोन्याची खरेदी ही कमी प्रमाणात करत आहेत. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानले जाते. परंपरा टिकून राहण्यासाठी कमी वजनाचे सोन्याचे दागिने खरेदीसाठी ग्राहक बुकिंग करत आहेत. मात्र दिवाळी पाडव्याला सोन्याचे दर वधारतील असा अंदाज सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सराफा बाजारात दोन दिवसांपूर्वी प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर हे १ लाख ३४ हजार तर चांदीचे १ लाख ८४ हजार रुपये इतके होते. मात्र रविवारी सोन्याच्या दरात घसरण होत, प्रति १० ग्रॅम १ लाख ३२ हजार इतके झाले. तर चांदी देखील १ लाख ७४ हजार रुपये प्रति किलो झाली.
ऑटोमोबाइल शोरूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत सोलापुरात एकूण अडीच हजार दुचाकी तसेच सातशे चारचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. तर पुढील आठवडाभरात तीन ते चार हजार दुचाकी आणि आठशे चारचाकी वाहनांची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगात जवळपास शंभर ते एकशे दहा कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी शोरूम धारकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सुमारे पाचशे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे. यंदा ईव्ही दुचाकींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी पाडव्याच्या दिवशी बुक केलेल्या गाड्यांचे वितरण होणार आहे.यंदा वित्तीय संस्थांकडून ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. चारचाकी वाहनांसाठी केवळ ८.९ टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या बुकिंगमध्येही मोठी वाढ झाली आहे.
चौकट
लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने प्रासादिक साहित्यांची खरेदी
दीपावली सणांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन साठी लागणारे विविध प्रासादिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये महालक्ष्मीचे मुखवटे, मणी मंगळसूत्र, लक्ष्मीचे रूप मानली जाणारी केरसुनी, विड्याचे पान, झेंडूची फुले, सुवासिक अगरबत्ती, श्रीफळ, दिनदर्शिका, महालक्ष्मी पूजा पान, केळीचे खुंटे, पाच फळे, ओटीचे साहित्य अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून सुवासिनी महिला वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्याचे चित्र दिसून आले.
कोट
इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी
ईव्ही दुचाकी वाहनांना केंद्र सरकारकडून ५ हजार आणि राज्य सरकारकडून १० हजार रुपयांची सबसिडी मिळत आहे. तसेच ईव्ही गाड्यांना केवळ ५.१० वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडून ४०० बुलेट गाड्यांचे बुकिंग झाले आहे. अद्याप बुकिंग सुरूच आहे. त्यामुळे यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
– घनश्याम चव्हाण चव्हाण शोरूम, सोलापूर
कोट
सोन्याच्या कमी वजनाच्या दागिन्याकडे ग्राहकांचा कल
दिवाळी पाडवा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे पाडव्याला सोने खरेदी केली जाते. या पार्श्वभूमीवर ग्राहक सोन्याचे विविध दागिने बुक करत आहेत. सध्या सोन्याचे दर दोन हजारांनी तर चांदीचे दर पाच हजारांनी कमी झाल्याने, कमी वजनाचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. मात्र पाडव्या दिवशी सोन्याचे दर वधारतील असा अंदाज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अस्थिर वातावरण आणि रुपयाचे होत असलेले अवमूल्यन यावरून केले जात आहे.
– सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष सोलापूर सराफा व्यापारी असोसिएशन.