मंगळवेढा – हूलजंती माहालिंगराया भेटी दरम्यान भाकणूकमधे गहू,हरभरा एक नंबर पिकेल,तांबड्या रंगाच्या धान्यांना किंमत येईल, बैलाला सोन्याचे दिवस येतील , पोर्णिमेच्या आतबाहेर पाऊस होईल. कोरोना पेक्षाही भयंकर रोगराई येईल. राजकीय नेते कोलांट्या उड्या मारत पक्षांतर करतील. उत्तर दिशेला वनवा पेटेल. लहान मुलांना आजार वाढतील, शेळ्या-मेंढ्यांमध्ये रोगराई पसरेल. जो देवाला नतमस्तक होईल त्याचं भलं होईल;ऊसाला चांगला दर मिळेल,अशी भविष्यवाणी (भाकणूक) येथे पार पडलेल्या ऐतिहासिक गुरु शिष्य श्री बिरोबा-महालिंगराया पालखी भेट सोहळ्यादरम्यान वर्तविण्यात आली आहे..
येलो फेस्टिवल म्हणून आज पर्यंत ओळखल्या जाणार्या श्री हुलजंती यात्रेत लाखाे भाविकांच्या उपस्थितीत श्री महालिंगराया-बिरोबा च्या नावाने चांगभलं च्या जयघोषात भक्तांनी लोकर, खारीक, खोबर्याच्या लाखो टन भंडार्याची उधळण करत भक्तीमय वातावरणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र हुलजंती येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
मंगळवारी पहाटेपासून मुंडास (आहेर) दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अख्यायिकेनुसार स्वर्गातून शंकर-पार्वती स्वतः महालिंगरायाच्या मंदिरातील पंचशिखराला हे मुंडास बांधतात.अमावस्येच्या रात्री शिव-पार्वती येथे भूकैलास हुलजंती होई जन्माला येऊन एकदा मुंडास पाही, या उक्तीप्रमाणे भाविक दिवसभर दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुलजंती परिसरातील सर्वच रस्ते भाविक भक्ताने गजबजलेले होते. मंगळवेढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी परभणीकडील दाेन संशयत महिला पाेलीसांनी ताब्यात घेऊन पाेलीस स्टेशनला चाैकशीसाठी बसवले आसल्याचे सांगण्यात आले.
ढोल-नगार्यांच्या गजरात नयनरम्य भेट सोहळा
गुरु बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या पालखी भेट सोहळ्यावेळी मंदिराजवळील ओढ्यात लाखो भाविकांनी नयनरम्य दृश्याचा आनंद घेतला. ढोल,कैताळ,नगार्यांच्या गजरात आकाशात भंडारा व लोकर उधळत चांगभलं च्या घोषात हा सोहळा संपन्न झाला.या अगोदर सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरडोन येथील बिरोबा यांसह सात पालख्यांच्या भेटीचा मान पार पडला.
या वेळी तीन औषधोपचार केंद्र व ५६ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत हाेती.
यात्रेकरूंना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरोग्य विभाग विशेष दक्षता घेतली. डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या ठिकाणी सर्व पाणी नमुने तपासणी आणि पाणी शुद्धीकरणाचे काम नियमितपणे सुरू हाेते तसेच, साथ रोग सर्वेक्षण करण्यासाठी विशेष पथके कार्यरत हाेती जेणेकरून कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा प्रसार होणार नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी आरोग्य विभागाने, यात्रेकरूना आरोग्य विभागाच्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले हाेते.