बार्शी – नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे तर्फे फार्मसी क्षेत्रातील सर्व सदस्यांना सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आव्हानाला महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील सर्व सदस्यांनी भरपूर प्रतिसाद देत आपल्या बांधवां प्रती कर्तव्य पूर्ती केली. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गाव सीना दारफळ येथील पीडित बांधवांबरोबर आज दिवाळी साजरी करण्यात आली.
जमा झालेल्या आर्थिक निधीतून आज फराळाचे वाटप गावातील सर्व लोकांना करण्यात आले. या मदतीकरिता स्वतः पूरग्रस्त असलेले असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी प्राचार्य डॉ प्रफुल्ल आडकर व त्यांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते रुपेश आडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रुपेश आडकर यांनी समयसूचकता ठेवत प्रत्येक पूरग्रस्त भागाची इत्यंभूत माहिती वेळोवेळी प्रशासन विभागाला दिल्यामुळे अनेक होणारे नुकसान त्यामुळे टाळण्यात आले. सीना दारफळ येथील पूरग्रस्त भागांचा आज आढावा घेत असताना काय भयानक परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. लोकांचे पिके नाहीत तर अख्खी शेती वाहून गेली आहे. या भागाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे सदर नुकसान न भरुन येणारे आहे. येथील नागरिक अजून मानसिकतेने प्रचंड खचलेले दिसले. रुपेश आणि डॉ. प्रफुल्ल यांच्यासारखे सामाजिक भान असणारे कार्यकर्ते असल्यामुळे लोकांना प्रचंड सहकार्य मिळत आहे.
राज्यभरातून येणाऱ्या मदतीचे सुयोग्य नियोजन रुपेश आडकर आणि त्यांची टीम करत असल्यामुळे मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य होते.
सदर मदत पोहोचवण्या करिता असोसिएशन पदाधिकारी सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, बार्शीचे प्राचार्य डॉ. सुजित करपे व सोलापूर जिल्हा जीएसटी अधिकारी निलेश सोनवणे व डॉ. प्रशांत जावळे, गावचे सुपुत्र व सोजर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. शिवाजी पाटील व सर्व आडकर कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
आपल्या सर्वांबरोबर दिवाळी साजरा करत असताना मनाच्या एका कप्प्यात आनंद वाटत असताना दुसऱ्या कप्प्यात अजून खूप मदत मिळणे आवश्यक असल्याचे शल्य जाणवत होते. या मदत कार्यासाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला ते असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अमोल शाह, अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्यपूर्ती केल्याचे समाधान वाटले.